Skip to main content

Command Palette

Search for a command to run...

प्रबळगड ते इर्शाळगड - प्रवासवर्णन

Updated
7 min readView as Markdown
प्रबळगड ते इर्शाळगड - प्रवासवर्णन

पूर्वार्ध

३० जुलै, २०२२ ला शुक्रवारी रात्री ८ वाजता प्रल्हाद चा फोन आला, म्हणाला उद्या ऑफिसला सुट्टी आहे आपण ट्रेकिंग ला जाऊयात. मी पण पटकन हो बोलून फोन ठेवून दिला. सकाळी ७ वाजता पनवेल स्टेशन ला भेटायचे ठरले. दुसऱ्यादिवशी दोघेही ७ च्या ठोक्याला पनवेल स्टेशन ला हजर होतो. तिथून आम्हाला प्रबळगडाच्या पायथाशी असणारे गाव (ठाकूरवाडी ) गाठायचे होते त्यासाठी पनवेल बस डेपोकडे निघालो पण मधेच २ रिक्शावाल्यांनी अडवून ४०० रुपयांत दोघांना सोडतो असा अट्टाहास लावला ते पाहून आम्हाला आमच्या प्रिय मित्र मिलिंद ची आठवण झाली जो एव्हाना ४०० रुपये देऊन रिक्षात जाऊन बसला असता . रिक्षावाल्यांच्या आर्जवीकडे विशेष लक्ष न देता ५० रुपयांत महामंडळाच्या बस ने जाऊ अश्या आवेशात आम्ही बस डेपो कडे निघालो. ८ वाजता ची बस पकडून आम्ही ८.४५ पर्येंत ठाकूरवाडी मध्ये पोहोचलो. ट्रेकर्स ने भरलेली ती बस जवळपास रिकामीच झाली. आणि प्रबळगडाच्या दिशेने आमचा पायी प्रवास सुरु झाला.

रात्री फोनवर बोलतानाच प्रबळगडावर जायचे हे ठरले होते पण प्रबळगडावरूनच पुढे असणारा इर्शाळगड सुद्धा जवळ करायचा हे सुद्धा प्रल्हाद ने ठरवले होते. यालाच आपण रेंज ट्रेक म्हणतो.मी मात्र इर्शाळगड जमला तर करू, बघू या विचारानेच निघालो होतो. कारण पाऊस बराच होऊन गेला होता आणि इतक्या गर्द झाडीतून इर्शाळगडाचा मार्ग सापडणे अवघडच होते.

प्रबळगडाची उंची साधारण २,३०० फूट आहे. अर्धा गड चढून झाल्यावर एक विस्तीर्ण पठार लागते. या पठारावर प्रबळगड माची हे गाव आहे. हे गाव चढून येईपर्येंत माझ्यासारखा रोज खुर्चीवर बसून काम करणारा शहरी माणूस सहसा थकून जातो. पीठ दळून आणण्यासारख्या मूलभूत गरजांसाठी या गावातील लोकांना गड उतरून खाली जावे लागते हे ऐकल्यावर आपण स्वतःलाच समजावतो की जो चढ उतार हे लोक रोज करतात ते आपण एक दिवस तरी करूच शकतो. बराच वेळ चालून अखेर २ तासात आम्ही गड सर केला पण खूप थकवा जाणवत होता. प्रबळगडावर पोहोचल्यावर आम्ही कलावंतीण गड जिथून दिसतो त्या टोकावर गेलो. या गडावर आकर्षणाचे केंद्र म्हणजे हे एकच टोक कारण इथून कलावंतीण गड दिसतो. खूप वेळ इथे बसून आम्ही हिरवी चादर पसरलेले डोंगर दऱ्या बघत होतो. त्याचबरोबर या नैसर्गिक जंगलात ५०-६० मजली काँकक्रिट च्या जंगलाने केलेला शिरकाव हि लक्षवेधी होता.

इथे थोड्यावेळ बसून आम्ही आराम केला ४-५ फोटो काढले आणि काळ्या बुरुजाच्या वाटेने निघालो. काळा बुरुज कलावंतीण टोकापासून २ किलोमीटर लांब आणि तिथे जाणारी वाट झाडाझुडपांनी व्यापलेली होती. जणू काही आपण २३०० फूट उंचीवरच्या जंगलातून प्रवास करत आहोत असेच वाटले. वातावरण इतके प्रसन्न होते कि गड चढल्यामुळे आलेला थकवा बऱ्यापैकी नाहीसा झाला होता. गडावरती खाण्यापिण्याचे बरेचशे स्टॉल होते. अश्याच एका स्टॉल वर आम्ही कांदे पोहे नसल्यामुळे २ मिनिटात तयार होणारी मॅगी ऑर्डर केली. गरमा गरम मॅगी पोटात गेल्यावर थोडं हायस वाटलं. आता पर्येंतच्या प्रवासात आम्ही बऱ्याच स्थानिक रहिवाश्यांना इर्शाळगडाला जाणाऱ्या मार्गा बद्दल विचारले होते. सगळ्यांच्या सांगण्यात थोडाफार फरक असला तरी "पावसाळ्यात त्या वाटेला गाईड लागेल" हे वाक्य सर्वांच्या तोंडी होते. या शेवटच्या स्टॉलवाल्याने ने सुद्धा हेच सांगितले. मग आम्ही आमच्या पुढच्या प्रवासाला लागलो, .....गाईड न घेताच.....

उत्तरार्ध

इर्शाळगडाच्या मार्गावर जाण्याआधी आम्ही काळ्याबुरुजावर गेलो. तिथून प्रबळगड आणि इर्शाळगडाला जोडणारी डोंगररांग दिसत होती आणि दूर असलेला इर्शाळगड स्पष्ट दिसत होता पण गडाच्या खाली तिथे जाणारी वाट मात्र दिसत नव्हती. दिसत होती ती फक्त गर्द झाडी. हे सगळं बघून मी प्रल्हाद ला विचारलं खरंच जाऊ शकतो का आपण ? तो म्हणाला जो पर्येंत वाट दिसतेय तो पर्येंत चालत राहू. मग तिथून आम्ही मागे फिरलो कारण इर्शाळगडाकडे जाणारी वाट मागे दरीतून होती. हि वाट काळ्याबुरुजाला वेढा घालून या दोन गडांना जोडणाऱ्या डोंगररांगेत जाऊन मिळते. आमच्यासाठी या डोंगररांगे पर्येंत पोहोचणे हेच मोठे आव्हान होते. त्या नंतर ची डोंगररांग सरळ रेषेत होती. तिथे हरवण्याचा प्रश्न नव्हता. मागे फिरून आम्ही चालत चालत त्या दरीपर्येंत पोहोचलो. तिथे "इर्शाळगडावर जाणारा मार्ग" अशी मराठी पाटी दिसली आणि आम्ही ती दरी उतरायला सुरुवात केली.

पावसाळा म्हणजे ट्रेकिंग चा ऋतू. थोडा पाऊस पडल्यावर मातीखालची बेडकं आणि फ्लॅट मधली ट्रेकर्स मंडळी आपोआप बाहेर पडतात. अर्थात नयनरम्य द्रुश्य आणि कमी जाणवणारा थकवा या पावसाळ्यातील ट्रेकिंग च्या जमेच्या बाजू. आता इर्शाळगडच्या मार्गावर मात्र आम्हाला पावसाळ्याचा काही विपरीत बाजूंचा सामना करावा लागणार होता उदारणार्थ गर्द झाडी झुडपांमध्ये हरवलेली वाट, शेवाळलेले दगड. याची प्रचिती आम्हाला लवकरच आली. आत्तापार्येंत माणसांनी तुडवलेली वाट चालून आम्ही गडापर्येंत पोहोचलो होतो मात्र या दरीत क्वचितच कोणी उतरले असेल त्या मुळे वाट शोधण्यात बराच वेळ जात होता. पण या वाटेवरच्या काही झाडांवर आम्हाला नारंगी रिबिन बांधलेल्या दिसल्या आणि समजले कि या रिबिन्स शोधत पुढे जायचं. काही दिवसापूर्वी इथून एखादा ट्रेकर्स चा ग्रुप गेला असणार आणि त्यांनीच हे वाट दाखवण्याचे सत्कर्म केले असणार.

या दरीत चालताना माझे पाय थरथर कापत होते कारण खाली उतरताना जिथे पाय ठेवू तिथे तो घसरत होता. अगदी काळजीपूर्वक पाय ठेवून सुद्धा. प्रल्हाद सुद्धा घसरत होता पण त्याचा ऊत्साह दांडगा होता. या दरीत आम्ही अश्या ठिकाणापर्येंत पोहोचलो होतो कि आता पुढचा मार्ग नाही सापडला आणि मागे फिरण्याची वेळ आली कि ते हि जड जाणार होते. त्यात मधेच काही माकड आम्हाला बघून आवाज करत होती. आम्ही दोघे सोडलो तर जवळपास सारा परिसर निर्मनुष्य होता. आमच्यापैकी कोणी घसरून पडला आणि त्याला दुखापत झाली तर त्याला खांद्यावर घेऊन जाण्यासारखा रस्ता हि नव्हता आणि ओरडून कोणापर्येंत आवाज जाईल अशी परिस्थिती हि नव्हती. आता माझ्या मनातल्या धाडसावर भीतीने अतिक्रमण चालू केले होते. माझ्यातल्या ट्रेकर ची अनुकूल परिस्थिती आता प्रतिकूल झाली होती. मी प्रल्हादला सांगितलं अजून पुढे नाही जाऊ शकत आपण आता मागे फिरू. पण प्रल्हाद ऐकणाऱ्यातला नव्हता. याआधी सांगितल्या प्रमाणे त्याचा आत्मविश्वास दांडगा होता.

सन २०१२ संद्याकाळचे ५-६ वाजले असतील. मी कॉलेज च्या कॅन्टीन मध्ये बसून चहा पीत होतो. समोरून प्रल्हाद येताना दिसला. माझ्या बाजूला बसून त्याने डबा उघडला आणि दुपारचा लंच संध्याकाळी खायला चालू केला. एवढ्या उशिरा का जेवतोस असे विचारल्यावर तो म्हणाला "buzy होतो जरा. HOD हॉल तिकीट नाही देत. final exam ला नाही बसता येणार कारण फी नाही भरली मी". प्रल्हाद ची त्यावेळची एकूण आर्थिक परिस्थिती बिकट होती आणि त्यात हे ऐकून मला अजूनच वाईट वाटलं. पण तो पुढे म्हणाला "life मध्ये struggle खूप आहे. आणि या struggle मधेच मजा आहे". थोड्याच वेळात त्याने डबा फस्त केला आणि म्हणाला चल स्टेशन ला सोड. तेव्हा मला समजले ह्या माणसाला कितीही प्रतिकूल परिस्थितीत टाका, हा तिथून बाहेर पडणारच. आज १० वर्ष झाली या प्रसंगाला आणि असे अनेक प्रसंग त्याने पचवलेत.

असा माणूस तुमच्या सोबत असेल तर तुम्हाला घाबरण्याची गरज नसते कारण त्या परिस्थितीचा भार ते स्वतःच्याच खांद्यावर घेतात आणि या प्रसंगात तर प्रल्हाद ने माझी बॅग पण स्वतःच्या खांद्यावर घेऊन माझा बराचसा भार हलका केला होता. इथून पुढे १० मिनिटांत आम्हाला पायवाट दिसू लागली आणि दोघांच्या हि जीवात जीव आला. पण डोंगररांग अजून खूप पुढे होती. माझी भिस्त प्रल्हाद वर आणि त्याची भिस्त झाडावरच्या नारंगी रिबीन वर असा खेळ चालला होता. थोडे अंतर कापून पुढे परत नारंगी रिबीन दिसली म्हणजे आपण बरोबर चाललो आहोत जर नाहीच दिसली तर तसेच मागे शेवटच्या पाहिलेल्या नारंगी रिबीन पर्येंत पोहोचायचं आणि इथून अंदाज बांधायचा, कि कोणता मार्ग असू शकतो. हे प्रल्हाद च्या आवडीचे काम होते आणि बहुतेक वेळा तोच अचूक मार्ग हुडकून काढायचा. बराच वेळ निघून गेला होता आणि अजून किती वेळ लागणार आहे याचा अंदाज बांधता येत नव्हता त्यात घशाला कोरड पडली होती आणि आमच्याकडे जी एकच बॉटल होती त्यातले पाणी संपले होते. शेवटच्या स्टॉलवर पाण्याची अजून एक बॉटल घ्यायला आम्ही विसरलो होतो. आत्तापार्येंतच्या ट्रेकिंगच्या अनुभवातून आमच्याकडून कधी नव्हे ते हि चूक झाली होती पण पावसाळी वातावरणामुळे आम्हाला झऱ्याचे पाणी मिळाले.

आमचा रिबीन शोधा जीव वाचवा हा खेळ चालूच होता. दोघांचे डोळे त्या रिबीन चा शोध घेत होते. एकेकाळी ज्या भगव्या रंगाने महाराष्ट्राला तारल होत तोच रंग आम्हाला तारणार होता. खूप वेळ चालल्यानंतर बऱ्यापैकी चांगला रस्ता मिळाला होता त्यामुळे चालण्यात वेग आला. थोड्याच वेळ अजून चालून आम्ही डोंगररांगेपर्येंत पोहोचलो आणि मनावरचा भार एकदम कमी झाला.डोंगररांग सुरू होताच एक पठार लागले. त्या छोट्याश्या पठारावर बसून आम्ही मागे राहिलेला प्रबळगड बघत होतो. दुरुन डोंगर साजरे याची प्रचिती आली होती.

अचूक पायवाट मिळाली होती त्यामुळे माझाही आत्मविश्वास वाढला होता. सकाळी ९ वाजता ट्रेक चालू केली होती आणि आता दुपारचे ३. २० झाले होते. आत्तापार्येंत उत्तम साथ देणारे आमचे पाय आता अजून नको असे म्हणत होते तरी शक्य होईल तेवढ्या वेगाने आम्ही चालत होतो. पुढच्या ४० मिनिटांत आम्ही ती डोंगररांग चालून संपवली. मध्ये एका ठिकाणी थांबून ग्लुकोज बिस्कीटाचा दोघात एक पुडा खाऊन पोटाला आधार दिला. डोंगररांगेच्या शेवटी एक चढण होती ती पार केल्यावर इर्शाळगड सुरु होतो. पण ही छोटी टेकडी चढणे सुद्धा खूप मुश्किल वाटत होते. आमची फुफुसे त्या बैल आणि बेडकाच्या गोष्टीतल्या बेडका सारखी फुगत होती. २-३ वेळा थांबून शेवटी आम्ही चढलोच आणि इर्शाळगड एकदाचा जवळ केला. या क्षणी हृतिक रोशन च्या लक्ष्य सिनेमा ची आठवण झाली जिथे अमिताभ बच्चन एक डायलॉग बोलतो "They have done it. पोहोच गये हमारे लडके वहा !" आमचे काम तेवढे मोठे नसले तरी भावना त्याच होत्या.

आता फक्त तिथल्या गावात जाऊन थेट जेवणाच्या ताटावर बसायचे होते. जेवणाची ऑर्डर आत्मविश्वासू प्रल्हादने आधीच देऊन ठेवली होती. श्रावण महिना चालू असल्यामुळे आम्ही शाकाहारी जेवण सांगितले होते. एवढे शारीरिक परिश्रम करून जेव्हा भूक लागते तेव्हा तुमच्या पुढ्यात जे येईल ते तुम्ही गोड मानून घेता. पण आमच्या समोर गरमा गरम तांदळाची भाकरी,पिठलं,डाळ,भात,लोंच, पापड एवढे जिन्नस भूक भागवणायसाठी होते. ते पिठलं तर आम्हाला सोन्याहून पिवळं वाटलं. भरपेट जेवून मन तृप्त झाले आणि पोट शांत झाले. सलग ५-६ तास चालून शरीर जे गरम वाफेचे इंजिन झाले होते त्याला थोड्यावेळ बसून शांत केले.

आमची रेंज ट्रेक सफल झाली होती पण इर्शाळगड उतरायचा बाकी होता. तिथून चालत मुंबई पुणे जुन्या महामार्गापर्येंत चालत जायचे होते. महामार्ग लांब होता म्हणून गावातून जाणाऱ्या स्थानिक रहिवाश्याकडून लिफ्ट घेतली आणि स्वदेश मधल्या शाहरुख प्रमाणे एका दुचाकीवर ट्रिपल सीट करून महामार्गापर्येंत पोहोचलो. तिथून महामंडळाच्या बस ने पनवेल स्टेशन गाठले. आजचा दिवस खुप अद्भुतपूर्व होता रेंज ट्रेक एका दिवसात पूर्ण केली होती. काही दिवस असे असतात जे कायमचे लक्षात राहतात आणि आपण त्यांचं गाठोडं बनवून अभिमानाने मिरवतो.अशा दिवसांच्या गाठोड्यात मी हा दिवस टाकला आणि खूप दिवसांनी रात्री शांत झोपलो.

Prabalgad to Irshalgad.png